घरात पाणी जाते, कुणाचेच लक्ष नाही
पिंडकेपार टोलीच्या रहिवासी शोभा मते म्हणाल्या, टोलीवर मोजमाप झाले. परंतु अद्यापही आम्हाला प्लाॅट भेटले नाही. पावसाळ्यात घरात पाणी जाते. नालीचे पाणी वाहून जात नाही. या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही. गतवर्षी पूर आला तरी आमच्या टोलीकडे कुणी आले नाही. पैसेही भेटले नाही. टोलीत पाणी शिरले नाही म्हणून मदत देता येत नाही असे त्या सांगत होत्या.
खास बाब म्हणुन पुनर्वसनाचे निर्देश
पिंडकेपार आणि पिंडकेपार टोली या दोन गावांचे खास बाब म्हणून पुनर्वसन करावे असे निर्देश शासनाने दिले आहेत. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार गावची २२६.२९ हेक्टर आर एवढी जमीन असून त्यापैकी १२१.१० हेक्टर म्हणजे ५० टक्के शेतजमीन बाधित होते. मूळ गावठाणातील पिंडकेपार येथील १४६ घरे बाधित होतात. त्या सर्व घरांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. तसेच नवीन वस्ती असलेल्या टोली या गावठाणातील ७४ घरे सुद्धा बाधित क्षेत्रात येत असल्याचा अहवाल मुख्य अभियंता गोसेखुर्द प्रकल्प यांनी पाठविला आहे. मुळ गावातील १४६ आणि नवीन गावठाणातील ७४ मिळून एकूण २२० घरांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु अद्यापपर्यंत टोलीचा प्रश्न कायम असल्याचे दिसून येत आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत २६ ऑगस्ट २००९ रोजी पिंडकेपार टोलीचे खास बाब म्हणुन पुनर्वसन करण्याचा शासननिर्णय ३१ ऑगस्ट २००९ रोजी निर्गमीत झाला होता. त्याअनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिंडकेपार टोलीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी तेथे ७४ कुटुंब वास्तव्यास होते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आहे. टोलीची संयुक्त मोजणी झालेली आहे. मोबदल्याचे पैसे विशेष भूअर्जन अधिकाऱ्यांकडे जमा आहेत. लवकरात लवकर मुल्यमापन करुन थेट खरेदीच्या माध्यमातून पिंडकेपार टोलीच्या ७४ पात्र कुटुंबांना मोबदला देण्यात यावा. उर्वरीत कुटुंबासाठीसुद्धा शासनाने प्रस्ताव मंजूर करुन टोलीवासीयांना न्याय द्यावा.
-यशवंत सोनकुसरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस