१८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक प्रमुख कमावती व्यक्ती यांचा या योजनेंतर्गत एलआयसीकडून विमा उतरविला जातो. या विम्याची रक्कम केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे २०० रुपये प्रतिलाभार्थी वार्षिक विमा हप्त्यापोटी आयुर्विमा महामंडळाकडे भरण्यात येतो. या योजनेत लाभार्थीला विम्यासाठी कुठलीही रक्कम भरावी लागत नाही. विम्याच्या अंतिम मुदतीपूर्वी सदस्याचा मृत्यू झाल्यास एलआयसीकडून वारसाला आश्वासित रक्कम ३० हजार रुपये दिले जातात, तसेच सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५ हजार रुपये किंवा अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये रक्कम भरपाई म्हणून लाभार्थीला दिली जाते. आम आदमी विमा योजनेसाठी भूमिहीन मजूर, पाच एकरपेक्षा कमी जिरायती व अडीच एकरपेक्षा कमी बागायती शेतजमीन धारण करीत असलेली व्यक्ती भूमिहीन समजली जाते .
लाखनी तालुक्यातील आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थींना गेल्या दोन वर्षांपासून लाभ मिळालेला नाही. लाभार्थींना तत्काळ लाभ देण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष धनंजय घाटबांधे यांनी केली आहे.