जिल्हाधिकारी कार्यालयात बालकांची काळजी व संरक्षणसाठी कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकारी कदम बोलत होते. या बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.एस. फारुकी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले, बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले की, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत, अशा बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतिदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी तालुकानिहाय बालसंगोपन योजनेचे अर्ज भरून घ्यावेत. अर्ज भरण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करावी, तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या अशा बालकांचा सांभाळ योग्यरीतीने होतो किंवा नाही याबाबत माहिती घेण्यासाठी बालकल्याण समितीने गृहभेट द्यावी. सोबतच आई- वडील दोन्ही गमावलेल्या बालकांच्या पाल्यांचे बँकेत खाते असल्यास त्या खात्याचे बालकांना नॉमिनी करण्यास मदत करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या एकूण बालकांची संख्या ५२१ आहे. त्यामध्ये आई गमावलेल्या बालकांची संख्या ५०, तर वडील गमावलेल्या बालकांची संख्या ४६५ आहे व दोन्ही (आई- वडील) गमावलेल्या बालकांची संख्या ०६ आहे. याबाबतचे अजूनही कामकाज सुरूच असून, जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे आई- वडील गमावलेल्या बालकांची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती बैठकीत दिली.