कामगार संघाच्या प्रयत्नांना यश : जिल्ह्यात लागू होणार ईएसआयसी योजना भंडारा : जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी एक शुभवर्तमान आहे. जिल्ह्यातील जवळपास १५ हजार कामगारांना केंद्र शासनाची ईएसआयसी योजना लागू होणार आहे. या आशयाचा दुजोरा ईएसआयसीचे संचालक ए.के. शर्मा यांनी दिला आहे. याबाबतीत भंडारा जिल्हा इंजिनिअर कामगार संघाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू होते. संघाच्या प्रयत्नाला उशिरा का असेना यश मिळाले आहे. केंद्र शासन पुरस्कृत ईएसआयसी (राज्य विमा योजना) राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये लागू आहे. यात भंडारा जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी कामगार संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे यांच्यासह कामगारांनी केली होती. यासंदर्भात ईएसआयसीचे संचालक ए.के. शर्मा यांच्याशी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत चर्चा केली. यावेळी पंचबुद्धे यांनी भंडारा जिल्ह्यातील कामगारांची स्थिती व त्यांच्या कुटूंबियांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ईएसआयसी योजना प्रभाविपणे लागू करावी, अशी आग्रही मागणी केली. यावेळी शर्मा यांनी सदर योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे पहिल्या फेरी अंतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी योजना लागू झाली आहे. आता भविष्यात भंडारा जिल्ह्याचाही समावेश होणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या शिष्टमंडळात श्रीकांत पंचबुद्धे, मुनेश्वर टिचकुले, लाला बारसागडे, पुरूषोत्तम नन्होरे, संजय कोचे, संजय बडोले, संजय गजभिये, शशिकिशोर बांडेबुचे, भास्कर टिचकुले, भुपेंद्र ढेेंगे, सचिन गोमासे, मुरली कनपटे, कैलास दामन, रामदास हलमारे, मिलिंद वासनिक, अतुल खोब्रागडे अशोक गायधने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१५ हजार कामगारांना मिळणार योजनेचा लाभ
By admin | Published: January 03, 2017 12:28 AM