रामचंद्र अवसरे : कुष्ठरोग निवारण मोहिमेचा शुभारंभभंडारा : हुतात्मांच्या आठवणी जतन करणे आज सर्वसामान्य जनतेची गरज आहे. आजचे विद्यार्थी भविष्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी पदावर कार्य भुषवतील, परंतु विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा, देशसेवा या बाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकवृदांनी विद्यार्थ्यांना कौशल्यशिल ज्ञान द्यावे. सेवेत श्रेष्ठ रुग्ण सेवा तीच खरी देश सेवा आहे. गावातील दारु विक्री बंद करणे आवश्यक आहे तरच जनतेच्या सहकार्यातून स्मार्ट ग्राम संकल्पना साध्य करणे शक्य होईल, असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. तालुका कुष्ठरोग निवारण मोहिमेचा शुभारंभ पहेला येथे करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, ग्रामपंचायत सदस्य सुनिल शेंडे, प्राचार्य एस.डब्ल्यु. थेरे, डॉ. रवी कापगते उपस्थित होते. आमदार अवसरे यांचे हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. रॅलीचे पथ संचलन पहेला गावातून करण्यात आले. रॅलीत कुष्ठरोगाबाबतची जनजागृती करण्यात आली. जनजागृती मोहिमेंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा अयोजित करण्यात आली. त्यामध्ये गांधी विद्यालय, पहेला येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र व रोख बक्षिस देण्यात आले. यात प्रथम पुरस्कार आस्था बांडेबुचे, द्वितीय पुरस्कार तेजस्विनी कायते तर तृतीय पुरस्कार आदीत्य चौधरी यांचा समावेश आहे. प्रस्ताविक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. वाय.बी. कांबळे यांनी केले. त्यांनी जिल्ह्यात २०१५ या वर्षात ४१७ नवीन कुष्ठरुग्ण शोधून काढण्यात आले आहे. अजूनही समाजात लुप्त अवस्थेत कुष्ठरुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करीता तालुका कुष्ठरोग निवारण मोहिम प्रत्यक्ष सर्वेक्षण सर्व स्तरावर १३ फेब्रुवारीपर्यत करण्यात आले आहे. या मोहिमेत जनतेने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. संचालन शिक्षिका गिरडकर यांनी केले. आभार प्रविंद्र पडोळे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
सेवेत श्रेष्ठ रुग्णसेवा, तीच खरी देशसेवा
By admin | Published: February 04, 2016 12:43 AM