भंडारा बसस्थानक, राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या वाहनांमधून कामगार परततानाचे चित्र दिसून येत आहे. गतवर्षी मार्च-एप्रिलमध्ये सर्वाधिक झळ ही मजूर कामगारांना बसली होती. याच भीतीने आता पुन्हा आपले व आपल्या कुटुंबीयांचे बेहाल होऊ नयेत म्हणून अनेक मजूर नागपूर, पुणे, औरंगाबाद, अमरावती सारख्या मोठ्या शहरातून आता परत आपल्या गावाकडे जाऊ लागले आहेत. मागील दीड महिन्यापासून कोरोना संसर्गाचा कहर वाढला आहे. त्यामुळे आता प्रशासनही हतबल झाले आहे. भंडाऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्यामध्येही आता दररोज वीस, एकवीस असे मृतांचे दररोज आकडे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शासन केव्हाही लाॅकडाऊन करू शकते. त्यामुळे रोजगाराच्या निमित्ताने गेलेले मजूर मिळेल त्या वाहनासह, एसटी, खासगी बसेस, रेल्वेने गावाकडे परतू लागले आहेत. मध्यंतरी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी रोजगारासाठी परत स्थलांतर केले होते. मात्र गतवर्षीचा वाईट अनुभव आणि खाण्यापिण्याचे होणारे वांधे यामुळे अनेकांना भीती सतावत आहे. यानंतर आपल्याला आपल्या गावी जायचे झाल्यास पायीच जावे लागेल, इथेच शहरात अडकून पडावे लागेल या भीतीने मजूर आतापासूनच आपल्या गावाकडे जाण्याची लगबग करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना संकट पूर्ण कमी होईपर्यंत गड्या आपला गावच बरा, गावात किमान मिळेल ती भाजीभाकरी खाऊन आपण जगू पण या मोठ्या शहरात आपण उपाशी मरू, या भीतीने प्रत्येकजण आपल्या गावाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
नागपूर-गोंदिया मार्गावर गर्दी
१) भंडारा जिल्ह्यात मोठमोठे उद्योग, कारखाने नाहीत. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून कामगार मोठ्या संख्येने भंडारा जिल्ह्यात स्थलांतरित होत नाहीत. मात्र अनेक जण छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या निमित्ताने जिल्ह्यात येतात. आता हेच विक्रेते पुन्हा लाॅकडाऊनच्या भीतीने आपल्या गावाकडे परतू लागले आहेत.
२) भंडारा बसस्थानकात तसेच खासगी वाहनातून अनेक जण आपल्या कुटुंबासह गावाकडे परततानाचे चित्र दिसून येत आहे. सरकारने अचानक लाॅकडाऊन केले तर आपली मोठी पंचायत होईल, म्हणून आता काहीच नको, आधी आपण गावाकडे पोहोचू असे मजूर सांगत आहेत.
३) भंडारा जिल्ह्यातील अनेक जण रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते, तेही आता पुन्हा एकदा आपल्या गावी परतू लागले आहेत. अनेक मजुरांना वाटेत असतानाच तर लाॅकडाऊन होणार नाही ना, या भीतीने अनेकजण छोट्या-मोठ्या खासगी खाजगी वाहनांचे बुकिंग करून टेम्पो तसेच इतर वाहनांची बुकिंग करून नांदेड, औरंगाबाद, नागपूर, मार्गावरून रायपूर, गोंदियाकडे परत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोट
१) गावात कोणीही मदतीला धावेल, इथं कोण मदतीला येणार?
नागपूरला कुटुंबपयांसह रोजगाराच्या निमित्ताने गेलो होतो. मात्र आता सरकार केव्हा लाॅकडाऊन करेल याचा नेम नाही. आमच्या बरोबरचे अनेक कामगार गावाकडे केव्हाच गेले, आम्हीच मागे राहिलो होतो. त्यामुळे आता एसटी बसने आम्ही गोंदियाला निघालो आहोत. गावात काही झाले तरी आपली नातेवाईक तरी मदतीला धावून येतात.
विष्णू मेश्राम, दिघोरी, भंडारा.
२ ) शहरापेक्षा आपलं गाव बरं
मी नोकरी निमित्ताने पुण्याला होतो. मात्र आता पुण्यातही परिस्थिती वाईट झाली आहे. पुन्हा सर्व बंद झाले तर काय करावे. त्यात कुटुंब गावाकडे आहे. म्हणून आता पुन्हा मीही गावाकडेच राहण्यासाठी चाललो आहे. -
-हरिहर धावडे, मोहाडी
३) मी औरंगाबादला एका खासगी कामासाठी अनेक वर्षांपासून आहे. मात्र तिथेही आता कोरोनाची भीती वाढत आहे. माझे कुटुंब आधीच गावाकडे पाठवले आहे. मी एकटाच औरंगाबादला कामासाठी राहत होतो. मात्र लाॅकडाऊन झाल्यास मोठी अडचण होईल, म्हणून ट्रकने गावाकडे चाललो आहे.
इरशाद शेख, गोंदिया.