भंडारा : जिल्ह्यात गत दोन महिन्यांत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भंडारा व पवनी या दोन तालुक्यांत डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेही या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव आता आटोक्यात आला.
भंडारा जिल्ह्यात एकूण ३६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. यात १५ पुरुष तर २० महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक प्रभाव सहा ते १८ वयोगटातील नागरिकांना असून त्यांची संख्या १६ एवढी आहे. डेंग्यूचे टाइप १ आणि ३ चे रुग्ण अधिक आढळत होते. मात्र, यंदा प्रथमच जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप २ प्रकारचे रुग्ण आढळले. त्यामुळे डेंग्यूचा व्हायरस आता बदलत असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
दोन ते तीन दिवस ताप असल्यास अथवा डेंग्यूच्या संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा.
डेंग्यूच्या टाइप २ च्या रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर वेळीच सावध होत उपचार घेण्याची गरज आहे.
बॉक्स
हे बदल काळजी वाढविणारे
ताप नसताना पॉझिटिव्ह
ताप, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, खाज सुटणे, अशक्तपणा वाटणे ही डेंग्यूची लक्षणे असली तरी लक्षणे दिसत नसतानासुद्धा डेंग्यूची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. जिल्ह्यातसुद्धा लक्षणे नसलेले तीन ते चार रुग्ण आढळले आहेत.
प्लेटलेट्स कमी नाही तरी पाॅझिटिव्ह
डेंग्यूची लागण झाल्यानंतर साधारणत: बऱ्याच रुग्णांचे प्लेटलेट्स कमी होतात. मात्र, काहींना या आजाराची लागण झाल्यानंतरही त्यांचे प्लेटलेट्स कमी होत नसल्याचे डॉक्टर आणि पॅथाॅलाॅजीच्या तज्ज्ञांनी सांगितले. डेंग्यूचा २ टाइप हा प्रकार थोडा धोकादायक आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
कोट
डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट्स कमी होणे गरजेचे नाही. बऱ्याच रुग्णांची रोग प्रतिकारशक्तीही चांगली असते. त्यामुळे अशा रुग्णांचे प्लेटलेट्स कमी होत नसतात. प्लेटलेट्स चांगले असणाऱ्यांचाही डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतो, असे बऱ्याच रुग्णांचे रिपोर्ट तपासल्यानंतर पुढे आले आहे.
- ओमकार नखाते, पॅथाॅलॉजिस्ट
कोट
जिल्ह्यात आतापर्यंत ३६ डेंग्यूचे तर सात मलेरियाचे रुग्ण आढळले. आजार नियंत्रणासाठी स्वच्छता बाळगा. सध्या जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाचा संसर्ग आटोक्यात असून आरोग्य विभागातर्फे प्रत्येक तालुक्यात आरोग्य केंद्रामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.
- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा