लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्षांनी धुळवड साजरी करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे सर्वांनीच धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्याचा बेत आखला आहे. मात्र, रस्त्यावर गोंधळ घालून धुळवड साजरी करीत असाल तर सावधान. धुळवडीच्या दिवशी पोलिसांचा सर्वत्र वाॅच राहणार असून जिल्हाभर १४०१ पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.कोरोना संकटामुळे दोन वर्षे घरात बसूनच सण-उत्सव साजरे करावे लागले. होळीचा सण उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. धुळवडीच्या दिवशी तर रंगांची उधळण केली जाते. मात्र, या सणात अनेक जण मद्य प्राशन करून गोंधळ घालतात. शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणतात. अशा गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या उपस्थितीत बुधवारी शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उपनिरीक्षक, ९९५ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड यांचा जिल्हाभर बंदोबस्त राहणार आहे. यासोबतच पोलीस नियंत्रण कक्षात चार पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक, १३ महिला पोलीस शिपायांसह २९ पोलीस कर्मचारी राखीव आहेत. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज झाला आहे.नागरिकांनी होळी व धुळवड साजरी करताना कुठेही शांतता भंग होणार नाही, दुसऱ्यांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीने होळी साजरी करावी. वाहन मद्यप्राशन करुन चालवू नये, असे आवाहन केले आहे.
धुलिवंदनासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना- कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी अगदी साधेपणात साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.- कोरोना संक्रमणामुळे धुळवडीला शक्यतो गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून सण साजरा करावा. एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, गुलालाची उधळण करताना कोरोना प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी.
होळी, धुळवड आणि रंगपंचमी आनंदात आणि शांततेत साजरी करावी. कुणीही रस्त्यावर गोंधळ घालू नये. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. धुळवडीला गोंधळ घालणाऱ्यांवर वाॅच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा
वाॅशआऊट मोहिमेत ६२ ठिकाणी धाडी- होळीच्या पर्वात मोठ्या प्रमाणात दारू गाळली जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात वाॅशआऊट मोहीम राबविण्यात आली. चार दिवसात ६२ ठिकाणी गावठी दारू अड्ड्यांवर धाडी मारुन ३ लाख ९७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पवनी, अड्याळ, जवाहरनगर, भंडारा, मोहाडी, आंधळगाव, तुमसर, सिहोरा, साकोली, लाखनी, पालांदूर, लाखांदूर, गोबरवाही, दिघोरी, कारधा, वरठी, करडी या ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.