भंडारा : जिल्ह्यात शहरांबरोबर ग्रामीण भागातही ऑनलाइन गेमचे शौकीन वाढीस लागले आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना लॉकडाऊन काळापासून लहान मुलेही ऑनलाइन गेमच्या विळख्यात सापडली आहेत. हे एक प्रकारचे व्यसन झाले आहेत. सोडता येत नाही अन् काही केल्या सुटतही नाही, अशी एकंदर स्थिती आहे. सायबर गुन्हेगार या गेमच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असतात. यापासून वेळीच सावध होण्याची गरज आहे.
फ्री फायर गेम नकाेच
ऑनलाइन मल्टिपल गेममधील चिटिंग गेम सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याच्या प्रकारामध्येच सर्वाधिक फसवणूक होत आहे. त्यामुळे फ्री फायर गेम नकोच, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
दीड वर्षात एकही तक्रार नाही
सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला येतात. अद्यापही सायबर गुन्हे शाखेकडे दीड वर्षात ऑनलाइन गेमच्या संदर्भात एकही तक्रार आलेली नाही. परंतु जिल्ह्यात असे गुन्हे घडणारच नाहीत, असे म्हणणे चुकीचे होईल.
मुलांपासून मोबाईल दूर ठेवलेलेच बरे
थोडासा विरंगुळा म्हणून ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असतात. यातून अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवलेलेच बरे.
कोणतेही गेमचे चीटिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका. गेम हॅकिंगच्या आमिषाला बळी पडू नका. ऑनलाइन गेमचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यापूर्वी कोणकोणती परवानगी मागितली जाते. ते काळजीपूर्वक बघा. कोणताही संभाव्य धोका लक्षात येताच त्यातून बाहेर निघा. अलीकडे ऑनलाइन धोकाधडीचे प्रकार वाढीस लागले आहेत. परंतु सुदैवाने जिल्ह्यातील एकही ऑनलाइन तक्रार नाही. परंतु सावधता बाळगणे गरजेचे आहे.
- अभिजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा, भंडारा.