लाखांदूर (भंडारा) : शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग पार करणारा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना साकोली ते वडसा महामार्गावर लाखांदूर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. हा बिबट्या ठार झाल्याची माहिती होताच परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
ठार झालेला बिबट्या दीड वर्ष वयाचा असून मादी आहे. शिकारीच्या शोधात तो रात्री राष्ट्रीय महामार्ग पार करून गावात शिरण्याच्या प्रयत्नात असावा. त्यावेळी एखाद्या वाहनाने त्याला जबर धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा बिबट्या ठार झाल्याची माहिती होताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला दिली.
वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित, क्षेत्र सहायक आय. जी. निर्वाण, जे. के. दिघोरे, वनरक्षक एस. जी. खंडागळे, एम. एस. चांदेवार, केवट, बी. एस. पाटील, प्रफुल राऊत, विकास भुते, पांडुरंग दिघोरे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातच जाळण्यात आला. यावेळी जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह व पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तथा मानद वन्यजीव संरक्षक उपस्थित होते.