भंडारा/ गडचिरोली : गत तीन दिवसांपासूनच्या संततधार पावसाने मध्य प्रदेशसह गाेंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगेला पूर आला आहे. या पुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, ६६० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे भंडारा जिल्ह्यातील एका राज्य मार्गासह ८१ रस्त्यांवरील वाहतूक पुरामुळे बंद पडली आहे. छत्तीसगडमधून येणाऱ्या पर्लकोटा नदीचे पाणी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये शिरले आहे. पुरामुळे जिल्हाभरात १९ मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या भंडारा शहरातील ग्रामसेवक काॅलनी, नागपूर नाका परिसर, भाेजापूर, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. ६६० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शाेध व बचाव कार्यासाठी एसडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे. पूरबाधितांची राहण्याची व जेवणाची साेय करण्यात आली आहे. वैनगंगेच्या काेपामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. शेतशिवारात माेठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धान पीक सडण्याच्या मार्गावर आहे. माेहाडी शहरासह तालुक्यात वैनगंगा व सूर नदीचे पाणी गावांत शिरले. लाखांदूर तालुक्यातही पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. पवनी तालुक्यातही अशीच स्थिती आहे.
नाल्याच्या पुरात वाहून गेला एक जण
तुमसर तालुक्यातील सिलेगाव ते वाहनी नाल्यावर पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीने पूल ओलांडणाऱ्यांपैकी एक जण वाहून गेला. श्यामा सांगोळे असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा सहकारी विशाल गजभिये याला वाचविण्यात यश आले. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सिलेगाव ते वाहनी नाल्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यातून विशाल गजभिये व श्यामा सांगोळे (दोन्ही रा. तिरोडा) हे दुचाकी (एम.एच. ३६ -९९५७) ने जात होते. त्यावेळी तिथे उपस्थित होमगार्ड जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे न ऐकता ते दुचाकी नाल्यावरून काढण्याचा प्रयत्न करू लागले. याचवेळी घसरून दोघे जण पुराच्या पाण्यात कोसळले.
गडचिरोलीत पुराने अडविले १९ मार्ग
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारच्या रिमझिम पावसानंतर मंगळवारी पावसाने पूर्णपणे उसंत घेतली असताना पूरस्थिती मात्र वाढल्याचे चित्र होते. गोसेखुर्द प्रकल्पातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. दरम्यान पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झालेल्या एकूण ४३१ नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.
भामरागड जलमय
पर्लकोटा नदीचे पाणी सोमवारी पुन्हा एकदा पुलावर चढून भामरागडमध्ये शिरले. मंगळवारी दिवसभर ही स्थिती कायम होती. मुख्य मार्गावरील अनेक घरे, दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने येथील २३० नागरिकांना सुरक्षितस्थळी आश्रय देण्यात आला आहे.