भंडारा - शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या खांब तलाव परिसरातील सिमेंट रस्ता बांधकामासाठी गेल्या ५० दिवसांपासून साखळी उपोषणावर बसलेल्या जय जवान, जय किसान संघटनेचा उपोषण मंडप मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाश्वभूमीवर प्रशासनाने शुक्रवारी पहाटे हटविला. या प्रकाराचा निषेध करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून शुक्रवारी दुपारी ३ वाजता अटक केली.
शहरातून गेलेल्या भंडारा- रामटेक राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम खांब तलाव परिसरात तीन वर्षापासून रखडले आहे. अहोरात्र वाहतूक होत असल्याने नेहमी अपघात घडत आहे. अनेकांचे बळी गेले. काही अपंग झाले. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी जय जवान, जय किसान संघटनेच्यावतीने २३ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले. मात्र अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही. दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत आहे. उपाेषण मंडप परिसरातून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे अचानक खांब तलाव चौकातील मंडप हटविण्यात आला.
हा प्रकार माहित होताच आंदोलक तेथे एकत्र झाले. या प्रकाराचा निषेध करीत घोषणा बाजी करून लागले. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला. त्यावरून दुपारी ३ वाजता आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली. जय जवान, जय किसान संघटनेच जिल्हाध्यक्ष सचिन घनमोर, मनिष सोनकुसरे, संजय मते, जगदिश कडव, प्रवीण बोरघरे यांनी अटक करण्यात आली.