लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विम्याच्या रकमेसाठी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षाने वाटमारीचा बनाव केल्याचा प्रकार वरठी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला. पाचगाव फाट्यावर चौघांनी अडवून सोन्याचे दागिने लुटल्याची तक्रार दिली होती. मात्र पोलिसांच्या चौकशीत सदर दागिने एका बँकेत गहाण असल्याचे पुढे आले आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.मधुकर छोटेलाल पटले (४२) रा.पाचगाव तालुका मोहाडी असे बनाव करणाऱ्याचे नाव आहे. तो पाचगाव तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष आहे. वरठी येथे नेहमी मोटरसायकलने जाणे येणे करीत असतो.
सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता पाचगाव वरून वरठी येथे जात होते. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी आपल्याला अडविले आणि १५ ग्रॅम सोन्याची चेन व १० ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून नेल्याची तक्रार वरठी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अज्ञात चार व्यक्तींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा नोंदविला. मात्र पोलिसांना या प्रकरणात संशय आला. त्यांनी मधुकर पटले यांची उलट तपासणी सुरु केली. सुरुवातीला काहीही माहिती देण्यास तयार नव्हते. परंतु पोलीसी खाक्या पडताच त्याने खरी हकीकत पोलिसांना सांगितली.सोन्याची चेन आणि अंगठी १५ ते २० दिवसापूर्वी आर्थिक अडचणीमुळे भंडारातील एका बँकेत गहाण ठेवली होती. त्यावर ७७ हजार रुपये कर्ज उचलले. तसेच यापूर्वी हेच दागिने एका फायनान्स कंपनीतही गहाण ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याचा विमा काढण्यात आला होता. एका विमा एजंटाने त्याला सांगितले की, तुझ्या सोन्याचा विमा काढला आहे. सोने चोरी गेल्याची तक्रार पोलिसात दे, तक्रारीची पावती आम्हाला दिली तर तुला एक लाख रुपये रक्कम मिळेल असे सांगितले. या विमा एजंटावर विश्वास ठेवून मधुकर पटले यांनी वाटमारीचा बनाव तयार केला अशी कबुली वरठी पोलिसांना दिली आणि स्वत:च त्यात अडकले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात, संदीप बांते, त्रिमूर्ती लांडगे करीत आहेत.वाटमारी झाल्याची तक्रार प्राप्त होताच चार अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र चौकशीत तक्रारदारानेच बनाव केल्याचे पुढे आले. प्रकरण न्यायालयात दखल केले जाईल व न्यायालयाच्या निदेर्शावरून कारवाई केली जाईल.-राजेशकुमार थोरात, पोलीस निरीक्षक वरठी