लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीनचाकी सायकलने घरी परत जाताना एका रानडुकराने दिव्यांग तरुणावर हल्ला करण्याची घटना तुमसर तालुक्याच्या सुकळी नकुल ते गोंडीटोला मार्गावर शुक्रवारी दुपारी घडली. जिवाच्या आकांताने त्याने रानडुकराला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.योगेश्वर केवल राऊत रा. सुकली नकुल असे दिव्यांग तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी तो आपल्या तीन चाकी सायकलने घराकडे जात होता. गोंडी टोला रस्त्यावरील जंगलातून आलेल्या एका रानडुकराने त्याच्या सायकलला धडक दिली. पायाने दिव्यांग असलेला योगेश्वर खाली कोसळला. त्यावेळी रानडुकराने त्याला चावा घेण्याचा प्रयत्न केला. दिव्यांग असल्याने त्याला उठून बसता येत नव्हते. त्यावेळी त्याने जिवाच्या आकांताने एका काठीने रानडुक्कराला पिटाळण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र रानडुक्कर त्याच्यावर चवताळून हल्ला चढवीत होते.त्याच वेळी एक वाहन त्या ठिकाणी आले. वाहनातील मजुरांनी डुकराला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल दहा मिनिटे रानडुक्कर दिव्यांग तरुणावर हल्ला करीत होता. शेवटी रानडुक्कर जंगलात पळून गेले.
भंडारा जिल्ह्यात दिव्यांग तरुणाने दिली रानडुकराशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 1:48 PM