इंद्रपाल कटकवार
भंडारा : हवामान खात्याचा अंदाज पुन्हा रविवारी खरा ठरला. दुपारी अडीच वाजतापासून जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट पडली. विशेषत: वादळी वाऱ्याने घरांचे व कडधान्यासह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. एकट्या लाखांदुर तालुक्यातील तीन गावांमधील सात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
२५ व २६ मार्चला अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. शनिवारी दुपारी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. शनिवारी आलेल्या पावसापेक्षा रविवारी दुपारी अचानकपणे हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने अतोनात नुकसान केले आहे. कडधान्यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे मुसळधार पाऊस बरसला. गहु, चना, लाखोरी पिकाला याचा फटका बसला आहे. दुपारी २ वाजतापर्यंत उन्ह तापले असताना वातावरणात अचानक बदल झाला. तुमसर व मोहाडी तालुक्यातही दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपुन काढले. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. लाखनी येथे गारपीटीसह पाऊस बरसला. पवनी, लाखांदुर, साकोली येथेही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवाहरनगर परिसरातही पाऊस बरसला. ऑटोवर कोसळला वृक्षवादळी वाऱ्यामुळे तुमसर पोलिस स्टेशन जवळ असलेल्या ऑटोस्टँडवर उभ्या असलेल्या ऑटोवर वृक्ष कोसळला. सुदैवाने यावेळी आऑटोमध्ये कुणी नसल्याने कुठलीही जीवीतहानी झाली नाही.मात्र ऑटोचे मोठे नुकसान झाले. तसेच खापा येथे वादळामुळे तुमसर-भंडारा राज्यमार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. ग्रामस्थांनी झाड बाजुला केल्याने वाहतुक पुन्हा सुरळीत झाली. वादळामुळे खापा येथील सापुजी भोयर यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा कोसळला. यात तीन जनावरे जखमी झाली. मोहाडी तालुक्यातील जांब येथे धनराज श्रीपात्रे यांच्या घरावरील टिनाचे छत उडुन गेले. पाणी घरात शिरल्याने जीवनोपयोगी साहित्यांची नासाडी झाली.
लाखांदुर तालुक्यातील सात घरे पडलीशनिवारी आलेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे पिकाचे नुकसान झाले आहे.तसेच गवराळा येथे दोन घरे, खैरी पट येथील दोन तर दहेगाव येथील तीन घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच चिचाळ व दहेगाव येथील प्रत्येकी दोन हेक्टरमधील मका पिकाची नासाडी झाली. तर खैरी पट येथे आठ हेक्टरमध्ये लावलेला मका पीक भुईसपाट झाले.