भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीतकांड प्रकरणात चौकशीत दोषी ठरविण्यात आलेल्या दोन परिचारीकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. तर एका परिचारीकेला जामिन मंजूर करण्यात आला. सात महिन्यानंतर येथील जिल्हा न्यायालयात मंगळवारी यावर सुनावनी झाली.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे लागलेल्या भीषण आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. चौकशी अंती या प्रकरणात तीन परिचारीकांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यांच्या विरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सात महिन्यानंतर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबिलढुके या दोन परिचारीकांचा अर्ज फेटाळण्यात आला. तर इंन्जार्ज परिचारीका ज्योती बारसागडे यांचा जामीन मंजूर करण्यात आला. अर्ज नामंजूर झालेल्या परिचारिकांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी सात दिवसाचा वेळ दिला आहे.