भंडारा : मोहाडी व पवनी तालुक्यातील अनेक भागात शनिवारला सायंकाळच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी परिसरात गारपीटीने झोडपून काढले. यामुळे शेतशिवारातील उन्हाळी धान पीक जमिनीवर लोळले. तसेच भाजीपाला पिकाची हानी झाली.
शनिवारला अचानक मोहाडी व पवनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला तर काही ठिकाणी गारपिट झाली. यामुळे शहरांसह ग्रामीण भागात एकच धावपळ उडाली. यामुळे शेतशिवारात कापून ठेवलेल्या उन्हाळी धानाच्या कळपा पाण्यात भिजल्या. त्यामुळे पाखर धान होण्याची शक्यता आहे. उभे धान जमिनीवर लोळल्याने कापणीचा खर्च वाढणार आहे. उन्हाळी मूंग व उळीद व अन्य भाजीपाला पीक यांचेही गारपिटीने नुकसान झाले.