लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार प्राध्यापक ट्रकच्या मागच्या चाकात चिरडून ठार झाले. ही घटना साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. (In Bhandara district, a professor was killed in a pothole on the national highway)
प्रा. प्रोफेसर शालिकराम बहेकार (वय ४०, मूळ गाव मळेघाट, ता. लाखनी, हल्ली रा. साकोली) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. ते साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील तिरुपती कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते. बुधवारी ते साकोलीवरून आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात गेले. दुपारी आपल्या दुचाकीने नेहमीप्रमाणे साकोलीकडे येत होते. मोहघाट परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर जांभळी सडक मागून आलेल्या ट्रकने (एमएच ०४ जेके ९८७९) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि त्याचवेळी त्यांच्या आंगावरून ट्रकचे मागील चाक गेले. त्यात चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती होताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करून प्राध्यापकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
साकोली ते मुंडीपार राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचल्याने खड्डे दिसतही नाहीत. खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे अनेक अपघात येथे घडत आहेत. बुधवारी एका निष्पाप प्राध्यापकाचा बळी गेला. प्रा. बहेकार यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे.