भंडारा : शाळा आटोपून सायकलने गावी परतणाऱ्या सातव्या वर्गातील विद्यार्थ्याला एका भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मासळ ते खैरी घर रस्त्यावरील तलावाजवळ घडली.
पारस माधवराव मेश्राम (१३) रा. खैरीघर असे मृताचे नाव आहे. तो मासळ येथील सुबोध विद्यालयात सातव्या वर्गात शिकत होता. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो आपल्या सायकलने खैरीघर येथून मासळ येथे शाळेत गेला. शाळा आटोपून सकाळी ११ वाजता सायकलने गावाकडे जात होता. त्यावेळी मासळ ते खैरीघर रस्त्यावरील तलावाजवळ भरधाव ट्रॅक्टरने (एमएच ३६ एल ३६४०) सायकलला मागून जोरात धडक दिली. ट्रॅक्टरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने चिरडून पारस जागीच ठार झाला. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या घटनेची माहिती होताच लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस अंमलदार मनीष चव्हाण, अनिल साबळे, पोलीस नायक भोयर, रोकडे, अनिल राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टर चालक प्रमोद लालाजी दोनोडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.