भंडारा : तुमसर येथून भंडारा येथे जाणाऱ्या बसच्या मागील चाकाचे नट बोल्ट निघाल्याने बसचे एक चाक निखळले. चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ बस थांबवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमध्ये ३० ते ४० शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली.
तुमसरहून भंडारा येथे जाणारी एम. एच.४० ए. क्यू.६०५८ भरधाव जाताना तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर बसच्या मागील चाकातील नटबोल्ट निघाले. हा प्रकार चालकाच्या लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान राखून बस नियंत्रित करून थांबविले. यामुळे एकच खळबळ माजली. प्रवाशांनी आपला श्वास रोखून धरला. बसमध्ये ३० ते ४० शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
४ ऑक्टोबरपासून तुमसर शहरातील शाळा सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सर्व प्रवासी सुखरूप बचावले. बसच्या चाकातील नट बोल्ट कसे निघाले, याची चौकशी सध्या सुरू आहे. जिल्ह्यात आयुष्य संपलेल्या बस गाड्या धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे.