मुंबई : भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे. मात्र, मतदानादरम्यान, काही ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याचे सांगत मतदान प्रक्रिया रद्द केल्याचे वृत्त आले होते. परंतू, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी या वृत्ताचे खंडन करत भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु असून कुठल्याही ठिकाणचे मतदान रद्द केले नाही असे सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे म्हणाले की, भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु आहे. या मतदार संघातील कुठल्याही ठिकाणचे मतदान रद्द केले नाही. 35 ठिकाणचे मतदान रद्द झाल्याचे वृत्त खोटे आहे. तसेच, या मतदारसंघातील सर्व ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले हे मैदानात उतरले आहेत.
Bhandara–Gondiya Bypoll 2018 : भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु - अभिमन्यू काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 1:33 PM