लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे हे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ६,३७,११२ मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ४,४२,४३१ इतकी मते मिळाली. मोदी लाटेमुळे २०१४ मध्ये देशात भाजपचे सरकार स्थापन झाले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत ही लाट कायम राहणार की चित्र बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर २०१८ मध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात मोदी लाट नसल्याचे चित्र निर्माण झाले होते.मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील पुन्हा एकदा भाजपच्या बाजुने कौल दिल्याने पाच वर्षांनंतरही मोदी लाट कायम असल्याचे चित्र दिसून आले.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात शेवटपर्यंत सस्पेन्स कायम होता. उमेदवारीसाठी दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र भाजपने अंतीम क्षणी भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे तर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पंचबुध्दे यांचा राजकीय प्रवास पाहता मेंढे हे नवखे उमेदवार होते. तर हे दोन्ही उमेदवार भंडारा जिल्ह्याचेच असल्याने या निवडणुकीत नेमकी बाजी कोण मारणार याकडे सुरूवातीपासूनच मतदारांचे लक्ष लागले होते. पंचबुध्दे यांच्या विजयासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मतदारसंघ पिंजून काढला. तर मेंढे यांच्या विजयासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ.परिणय फुके यांनी मतदारसंघात तळ ठोकून बांधनी केली. तसेच स्वत:ला प्रचारात झोकून घेतले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व आणि केलेली विकास कामे, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना तसेच भाजप सरकारने जनतेसाठी घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. तसेच प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी त्या मतदारसंघातील आपल्या पक्षाच्या आमदारावर सोपविली. यामुळे भाजपाच्या आमदारांनी सुध्दा निवडणुकी दरम्यान संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. यासर्व गोष्टी मेंढे यांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. विशेष म्हणजे सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथे जाहीरसभा घेतली. या सभेला सुध्दा मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सुध्दा मतदारांचा कल बदलण्यास मोठी मदत झाली. यासर्व गोष्टीमुळे मेंढे यांच्या विजयाचे पारडे जड होण्यास मदत झाली. शिवाय या निकालाने भंडारा-गोंदिया मतदारसंघात पुन्हा एकदा मोदी लहर कायम असल्याचे दिसून आले.