- गोपालकृष्ण मांडवकर भंडारा - भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यासह साकोली आणि लाखांदूर या तीन तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. शनिवारच्या रात्री या तीन तालुक्यासह जिल्ह्यात ८.१३ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
लाखनी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात रात्री दोन वाजताच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. सुमारे अडीच किलो वजनाची गार होती, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. सकाळपर्यंत या गारा विरघळल्या नव्हत्या. गारपीटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू ओंबीवर आला असतानाच हा तडखा बसला. यामुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले. सकाळपर्यंत शेतशिवारामध्ये गारांचा खच पडलेला होता. यासोबतच भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील कौलारू घरांचे गारांमुळे मोठे नुकसान झाले. शेतमालाच्या नुकसानीची कृषी विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाहणे करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.