भंडारा : शनिवारी, २७ मे रोजी झालेल्या भांडणात अभिषेक साठवणे याने अमनचे काका किरण नंदूरकर यांच्या गालावर थापड मारली होती. आपल्या काकाला मारल्याचे पाहून अमनला राग आला होता. त्यामुळे त्याचाही अभिषेकसोबत वाद झाला होता. या वादानंतर समेटासाठी दुसऱ्या दिवशी रविवारी, २८ मे च्या रात्री अभिषेक आपल्या सोबत्यांसह आला. मात्र, आदल्या दिवशीचा राग मनात असल्याने त्याने थेट अभिषेकला चाकूने भोसकले, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
दरम्यान, अमनचा खून आणि त्यानंतर जमावाने अभिषेक साठवणे याला केलेल्या मारहाणीतील मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गटांतील एकूण दहाजणांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीनाचाही समावेश आहे.
या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी सोमवारपर्यंत तिघांना अटक केली होती. मंगळवारी पुन्हा सातजणांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. यामुळे ही संख्या १० वर पोहोचली आहे. अभिषेक साठवणेच्या मारहाणीतील मृत्यू प्रकरणात आकाश जयस्वाल, अभिषेक गायधने, आकाश कडूकर आणि शुभम बडवाईक या चौघांना, तर अमनच्या खूनप्रकरणी अजय मानकर, कलश लोखंडे आणि एका अल्पवयीनाला ताब्यात घेऊन मंगळवारी अटक करण्यात आली. या सातही जणांना आज, बुधवारी सकाळी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंत अमनच्या हत्येप्रकरणी निशांत रामटेके, साहिल मालाधरे आणि अतुल तांडेकर यांना अटक केली होती. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
समेटासाठी बोलावले कोणी ?
शनिवारच्या वादानंतर समेटासाठी नेमके बोलावले कोणी, असा प्रश्न पोलिसांपुढे पडला आहे. अमनच्या नातेवाइकांनी, अभिषेकनेच समेटासाठी येत असल्याचा निरोप दिला होता, असे सांगितले जात आहे. तर समेटासाठी या असा अमनकडूनच निरोप होता, असा दावा अभिषेकच्या गटाकडून केला जात आहे. यामुळे नेमका समेटासाठी पुढाकार कोणाचा होता, हे शोधणे पोलिसांना महत्त्वाचे आहे.
दोघांवरही अंत्यसंस्कार
दरम्यान, अमन आणि अभिषेक या दोघांवरही सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. अमनवर दुपारी, तर अभिषेकवर सायंकाळी नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले.