भंडारा : दोनही मुलीच झाल्या आणि त्याही सावळ्या आहेत म्हणून पतीकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्यांसह मातेने वैनगंगा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. याप्रकरणी कारधा पोलिसांनी पतीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दिपाली शितल खंगार (३२) रा. तिड्डी या मातेने आपल्या देवांशी (तीन वर्ष) आणि वेदांशी (दीड वर्ष) या चिमुकल्यांसह वैनगंगा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. कारधा पोलिसांनी सुरूवातीला याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. मात्र दिपालीने आपल्या दोन चिमुकल्यांना घेवून एवढ्या टोकाचे पाऊले का उचलले हा प्रश्न कायमच होता.
या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान रविवारी मृत दिपालीचा भाऊ दिलीप चांगो मारबते (२८) रा.धुसाळा ता. मोहाडी याने कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत दिपालीला दोनही मुलीच झाल्या होत्या. त्या रंगाने सावळ्या झाल्या यावरून पती नेहमी भांडण करीत होता. दररोज तिचा अन्वित छळ होत होता. यातूनच शुक्रवारी रात्री त्यांच्या जोरदार वाद झाला. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास सर्व मंडळी झोपली असता ती दोन चिमुकल्यांना घेवून रागाने निघून गेली. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी तिघांचा मृतदेहच आढळला होता.
दिलीप मारबते याने दिलेल्या तक्रारीवरून पती शितल बाळकृष्ण खंगार (३२) रा. तिड्डी याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारधा पोलिसांनी आरोपी पती शितल याला अटक केली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील करीत आहे.
समाजमन सुन्न
दोनही मुलीच झाल्या म्हणून दिपालीचा नेहमी छळ होत होता. हा प्रकार तिने आपल्या माहेरीही सांगितला होता. परंतु तिची समजूत काढण्यात आली होती. ती पतीसोबत तिड्डी येथे राहत होती. मात्र आरोपी पती शितल नेहमी दोनही मुलीच झाल्या. त्याही सावळ्या रंगाच्या असे म्हणून तिचा छळ करीत होते. त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले आपल्या मागे आपल्या चिमुकल्यांचे काय होणार म्हणून त्या दोघांनाही घेवून तिने वैनगंगेत उडी घेतली. या घटनेमागे कारण पुढे आले तेव्हा समाजमन सुन्न झाले.