लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावू नये, रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे सातत्याने प्रयत्नरत आहेत. गेल्या दोन दिवसात त्यांनी भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला आहे. त्यानंतर शनिवारी पुन्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्सिजन घेऊन दोन टँकर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामुळे ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णांचे जीव धोक्यात आले होते. हीच बाब लक्षात घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. तसेच दोन्ही जिल्ह्यांसाठी नियमित ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यास सांगितलेे होते. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० टनचे दोन ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करुन देण्यात आले. त्यानंतर शनिवारी नागपूर येथून लिक्विड ऑक़्सिजन घेऊन दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एक-एक टँकर दाखल झाला. गोंदिया येथे श्याम ट्रेडर्सकडे टँकर क्रमांक (एमएच ४० एन ५२४०) तर भंडारा येथील सनफ्लॅग येथे टँकर क्रमांक (एमएच ४०, ७०३२) दाखल झाले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात निर्माण झालेल्या कोविड परिस्थितीवर खासदार प्रफुल्ल पटेल यांचे लक्ष असून, ते दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. माजी आमदार राजेंद्र जैन हे सुध्दा दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थिती संदर्भातील माहिती खासदार पटेल यांना देत आहेत.