केंद्राच्या सौरऊर्जा मिशन अंतर्गत बसविले संयंत्र भंडारा : केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन’अंतर्गत भंडारा आयुध निर्माणी कारखान्यात सौरऊर्जेपासून १० मेगावॅट वीज तयार करण्यात येणार आहे. यासाठी संयंत्र बसविण्यात आले असून यातून दररोज दोन मेगवॉट (१० हजार युनिट) वीज तयार होणार आहे. या सौरऊर्जेपासून तयार होणारी वीज दैनंदिन विजेच्या दराच्या तुलनेत परवडणारी आहे.सौर ऊर्जा प्लान्टचे उद्घाटन आयुध निर्माणीमध्ये लावण्यात आलेल्या दोन मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्लान्टचे उद्घाटन वरिष्ठ महाप्रबंधक ई.आर. शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर महाप्रबंधक आइथा उमाशंकर, डॉ.पी. एन. महाजन, पी. के. मेश्राम, सी.एच. बाबू आंबेडकर, बी. के. गौड, शशांक गर्ग, निशिथ द्विवेदी, जेसीएम वर्क्स कमेटी, युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)१० एकरात संयंत्र‘राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन’अंतर्गत भंडारा आयुध निर्माणीत १० मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १० एकर जागेवर सौर ऊर्जा प्लाँट सुरू होणार आहे. त्यासाठी सोलर पॅनेल लावण्यात आले आहे. प्रारंभी दोन मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प आहे. १२ कोटींचा खर्च सौरऊर्जा निर्मितीला गती मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘एज्योर पॉवर’ ही कंपनी वीज निर्मिती करणार आहे. योजनेच्या निर्धारित प्रारूपानुसार दोन मेगावॅट क्षमतेच्या या प्लाँटसाठी आयुध निर्माणीने १२ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. या केंद्रातून तयार होणाऱ्या विजेचा मोबदला पुढचे २५ वर्षे या कंपनीला द्यावे लागणार आहे. त्यानुसार या कंपनीला प्लाँटसाठी केंद्राकडून सबसिडी देण्यात आली आहे.५.५० रूपये युनिट दर आयुध निर्माणीला दररोज ४० ते ५० हजार युनिट वीज ‘महावितरण’कडून घ्यावी लागते. आता या ठिकाणी १० हजार युनिट वीज दररोज तयार होणार आहे. वीज खरेदीवर होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. या निर्माणीतून तयार होणारी वीज ५.५० रूपये प्रति युनिट दराने उपलब्ध होणार असल्याचे संयुक्त महाप्रबंधक शशांक गर्ग यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
भंडारा आयुध निर्माणीत होणार १० मेगावॅट सौरऊर्जा
By admin | Published: March 29, 2017 12:34 AM