यशवंत पंचायत राज पुरस्कार : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मानभंडारा : राज्य शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात अव्वल ठरलेल्या भंडारा पंचायत समितीला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात गुरुवारला हा पुरस्कार वितरण समांरभ पार पडला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलीक, ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव असीमदास गुप्ता, गिरीश भालेराव उपस्थित होते. हा पुरस्कार भंडारा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, सभापती प्रल्हाद भुरे, उपसभापती ललित बोंद्रे, विस्तार अधिकारी प्रमोद हुमणे यांनी स्वीकारला. यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भंडारा पंचायत समितीला नागपूर विभागाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कारात ९ लाख रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पंचायत समितीला सन्मानित करण्यात आले.भंडारा पंचायत समितीने प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य, बांधकाम, अंगणवाडी, कृषी, शिक्षण, अभिलेख वर्गीकरण, योजनांची माहिती, कामकाज, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, समाजकल्याण, जिवन्नोत्ती अभियान, स्वच्छ भारत मिशन यासह महत्वाच्या विषयात भंडारा पंचायत समितीने उत्कृष्ठ कामगिरी केली. या कार्याची दखल घेवून यशवंत राज पंचायत समितीने भंडारा पंचायत समितीची नागपूर विभागीय प्रथम पुरस्कारासाठी निवड केली. मागील महिन्यात यशवंत पंचायत राज समितीच्या राज्यस्तरीय चमूने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन करण्याच्या दृष्टीने भंडारा पंचायत समितीची पाहणी केली होती. (शहर प्रतिनिधी)पंचायत समितीच्या सर्व विभागप्रमुख तथा कर्मचारी व पदाधिकारी यांच्या सहकार्यातून हे यश मिळविता आले. पुरस्कार मिळाल्याने नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याची जबाबदारी आली आहे. ती समर्थपणे सांभाळून पुढीलवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करण्याच्या दृष्टीने यथोचित प्रयत्न करु.- मंजूषा ठवकर, खंडविकास अधिकारी पं.स. भंडारा.
नागपूर विभागात भंडारा पंचायत समिती अव्वल
By admin | Published: April 17, 2017 12:24 AM