भंडारा : जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी आदी चार बाजार समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार जाेमात सुरू आहे. एकूण २८ केंद्रांवर २८ एप्रिल रोजी भंडारा व लाखनी येथे तर ३० एप्रिल रोजी पवनी व लाखांदूर येथे मतदान होणार आहे. एकूण ८४५१ मतदार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. यानिमित्ताने मतदारांना देवदर्शनाचा लाभ मिळण्याचा योग आहे.
जिल्ह्यात तीन बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी १८ संचालकांसाठी निवडणुका अत्यंत चुरशीच्या व काट्याच्या होणार आहेत. लाखांदूरात एकूण १८ संचालकांपैकी ५ संचालक अविरोध निवडून आल्याने १३ संचालकांसाठी निवडणूक होत आहे. चारही बाजार समितीत एकेका मतदानासाठी उमेदवार जीवाचे रान करीत गावोगावी हिंडत आहेत. मतदारांच्या थेट घरी भेट देण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्धार करीत 'एकला चलो रे चा' नारा दिला आहे. राष्ट्रवादीने दगा दिल्याचा आरोप करीत प्रचारात रंगत भरली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपा व शिंदे गटाशी हातमिळवणी करीत जिंकण्याच्या इराद्याने उमेदवार मैदानात उतरविले आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत नसलेल्या सर्वच पक्षांच्या राजकारण्यांनी निवडुकीत थेट हस्तक्षेप वाढविला आहे.
जिल्हा प्रमुखांबरोबर आजी- माजी आमदारांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच राजकीय पक्षांच्या तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना प्रचाराच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. प्रचाराचे साहित्य, बॅनर, होर्डींग गावोगावी लागले आहेत. परंतु, परस्पर विरोधी विचारधारेच्या नेत्यांचे निवडणुकांतील मनोमिलन पाहून सर्वसामान्यांत चर्चांना वेग आला आहे