भंडारा पॅटर्न राज्यात लागू : आधार लिंकमध्येही प्रथम, जिओ टॅगिंगमध्ये सर्वात पुढेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करताना मजुरांना विहित वेळेत मजुरी देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. मनरेगामध्ये मजुरांना विहित वेळेत मजुरी देण्यामध्ये भंडारा जिल्हा राज्यात अव्वलस्थानी ठरला आहे. जिल्ह्यात ९३.५८ टक्के मजुरीचे विहित वेळेत वाटप करण्यात आले असून वेळेत मजूरी देण्याचा ‘भंडारा पॅटर्न’ राज्यात लागू करण्याच्या सूचना रोहयोचे प्रधान सचिवांनी दिले आहेत.मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची मजूरी वेळेत देण्याचे कायद्यात नमूद आहे. भंडारा जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ९२ टक्के व आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ९३.५८ टक्के मजूरी विहित वेळेत देण्यात आली. या वर्षाअखेर ५५ टक्क्यापेक्षा जास्त मजूरांना वेळेत मजूरी देण्याचे नियोजन करण्यात आले, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यप्रणाली अवलंबिली आहे.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात ही कार्यप्रणाली अंमलात आणल्यामुळे प्रत्येक तालुक्यात वेळेत मजुरी देण्यात आली. याची दखल घेत रोहयो सचिवांनी राज्यभर भंडारा पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रोहयोचे प्रधान सचिवाकडे भंडारा पॅर्टनचे सादरीकरण करण्यात आले होते.मजुरांना वेळेत मजूरी देण्यासोबतच आधारलिंक करण्यात भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात २ लाख ९० हजार ८६७ सक्रीय मजुरांपैकी आतापर्यंत १ लाख ६० हजार सक्रीय मजुरांना आधार प्रणालीद्वारे मजुरी देण्यात आली असून त्याची टक्केवारी ६० आहे. मनरेगा योजनेंअंतर्गत मजुरी देणे हे आधार लिंकद्वारे सुलभ होत असल्याने जास्तीत जास्त मजुरांनी स्वत:चे खाते क्रमांक व आधार क्रमांक लिंक करण्याकरीता पुढाकार घेतला आहे. मनरेगा योजनेत ग्रामीण भागातील महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. भंडारा पंचायत समिती अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्वच अधिकारी, कर्मचारी या महिला आहे. त्यामुळे भंडारा तालुका मनरेगा अंमलबजावणीत देश पातळीवर चमकला आहे. मनरेगा सुरू झाल्यापासून जिओ टॅगिंग करण्यामध्येही भंडारा जिल्हा राज्यात अव्वल असून आतापर्यंत निर्माण झालेल्या २६ हजार ३६८ कामांपैकी २० हजार २६२ कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. मनरेगांतर्गत वेळेत मजुरी देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद साधण्यात येतो. भंडारा जिल्ह्याची माहिती व व्यवस्थापन पध्दत (एम.आय.एस.) जलद ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. मजुरांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येते. ग्रामविकास व अंमलबजावणी यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवला जातो. यामुळे मनरेगाच्या अंमलबजावणीत भंडारा जिल्हा राज्यात अव्वल आहे. आता हा पॅटर्न राज्यभर राबविला जाणार असून ही बाब जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे.- सुहास दिवसे,जिल्हाधिकारी भंडारा.
मनरेगात भंडारा राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:13 AM