- देवानंद नंदेश्वर भंडारा - मध्य प्रदेशातून धानाचे पोते घेऊन येणाऱ्या ट्रकला अन्य दुसऱ्या ट्रकने कट मारल्याने ट्रक चालकांचे नियंत्रण सुटले. यात धानाचे पोती घेऊन येणारा ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील बिनाखी गावांचे शेजारी उलटला. ही घटना रविवारी पहाटे ५ वाजता घडली आहे. धानाचे प्रचंड नुकसान झाले. ट्रक चालक शुभम पाचे (२३) रा. रजेगाव ( मध्यप्रदेश ) असे जखमीचे नाव आहे.
भंडारा - बालाघाट या १०० किमी अंतरच्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहे. तीन टप्प्यात घोषित करण्यात आलेल्या महामार्गाची वर्षभरापूर्वी झाली आहे. परंतु प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात आली नाही. याउलट नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक सिहोरा परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. अरुंद असणाऱ्या महामार्गावर जड वाहतूक वळते करण्यात आल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने अपघात वाढले आहेत. यात अनेकांनी जीव गमावला आहे.
चारचाकी, दुचाकी वाहनांच्या अपघाताचे वाढत्या घटना घडल्या आहेत. मध्यप्रदेशातील घनसोर येथून धानाचे पोते घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०६ जीपी ०८०५ ला राष्ट्रीय महामार्गावरील बिनाखी गावांचे शेजारी या ट्रकला रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या अन्य दुसऱ्या ट्रकने कट मारली असता धानाचे पोते घेऊन येणाऱ्या ट्रक चालक शुभम पाचे यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. महामार्गाचे कडेला ट्रक उलटल्याने धानाच्या पोत्याची नासाडी झाली. नाल्यात धानाचे पोते अस्तव्यस्त असल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पहाटे ट्रकचा अपघात झाला असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे. ट्रकमध्ये धानाचे पोते किती होते. यासंदर्भात माहिती मिळाली नाही. दरम्यान घटनेची नोंद सिहोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली नाही.