भंडारा : अधिकृत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ६ वर्षासाठी निलंबित केले असून यात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षाचाही समावेश आहे.
ठाणा परसोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जुन्या काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी न देता भाजप आयात व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे, काँग्रेसमधील काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्या ५ पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी ६ वर्षासाठी निलंबित केल्याचे पत्र काढले आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजकपूर राऊत, माजी उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग निशाने, ठाणा क्षेत्राचे जिल्हा परिषद प्रभारी मुन्ना भोंगाडे, ठाणा पंचायत समितीचे प्रभारी जितेंद्र पडोळे यांचा समावेश असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिली.