भंडारा : जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींचे निकाला घोषित होताच दावे-प्रतिदावे सुरू झाले असून शिवसेना-शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर समर्थित पॅनलने ११ ग्रामपंचायतीवर तर काँग्रेसने नऊ ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्याचा दावा करण्यात आला. साकोली तालुक्यात झालेल्या एकमेव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलने बाजी मारली. रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी भंडारा तहसील कार्यालयापुढे सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. विजयी उमेदवारांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
भंडारा जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी २३ हजार ३२५ मतदारांपैकी १८ हजार ५१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७९.३६ टक्के होती. मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी हिंगे यांच्या मार्गदर्शनात सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
भंडारा विधानसभा क्षेत्रातील १७ ग्रामपंचायतीपैकी ११ ग्रामपंचायतीवर शिवसेना-शिंदे गट समर्थित आमदार नरेंद्र भोंडेकर गटाचे सरपंच विजयी झाल्याचा दावा करण्यात आला. राजेदहेगाव स्वाती रत्नदीप हुमणे, खराडी आशा संजय हिवसे, पिपरी देविदास ठवकर, संगम शारदा मेश्राम, केसलवाडा आशु वंजारी, खैरी सलिता जयदेव गंथाडे, टेकेपार प्रियंका दिनेश कुंभलकर, गोसे बुज. आशिष माटे, भोजापूर सीमा जयेंद्र मेश्राम, खमाटा रुपाली रनजित भेदे, इटगाव कविता सोमनाथ चौधरी सरपंचपदी विजयी झाले. हे सर्व सरपंच आमदार भोंडेकर गटाचे असल्याचा दावा करण्यात आला. तसेच १७ ग्रामपंचायतीमधून १३७ उमेदवार भोंडेकर गटाचे रिंगणात होते. त्यापैकी ८० सदस्य विजयी झाल्याचा दावा करण्यात आला. सोमवारी आमदार भोंडेकर यांच्या कार्यालयासमोर विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला.
तर काँग्रेसने नऊ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवल्याचा दावा केला आहे. त्यात भोजापूर, खराडी, राजेदहेगाव, परसोडी, मरकधोकडा, सिरसघाट, इटगाव, टेकेपार, देव्हाडी, डोंगरी बुज., ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर साकोली तालुक्यातील सिरेगाव टोला ग्रामपंचायतीवर भाजप समर्पित पॅनलने झेंडा रोवला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही ग्रामपंचायतीवर झेंडा रोवल्याचा दावा केला आहे.
डोंगरीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या जागृती बिसने
तुमसर तालुक्यातील डोंगरी (बु) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलच्या जागृती प्रफुल्ल बिसणे विजयी झाल्या. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनल रिंगणात होते. रविवारी मतदान होऊन सोमवारी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. त्यात काँग्रेस समर्थित पॅनलच्या उमेदवार जागृती प्रफुल्ल बिसने ११३४ मते, भाजप समर्थित नीतू हनवते यांना १०५० तर राष्ट्रवादी समर्थित जयश्री चौधरी यांना ५७८ मते मिळाली. यात जागृती बिसने विजयी झाल्या. १४ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रकाश जिभकाटे, वर्षा कटरे, कविता गौतम, मुक्ताबाई आचापाचे, मालती राहंगडाले, आत्माराम नंदकिशोर रहांगडाले, चेतनलाल मिरचुले, दीपिका चौधरी, संध्या शहारे, राजकुमार तोलानी, अवकाश राऊत, राजकुमारी मडावी, सरस्वती मेश्राम आदी विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळासाहेब तेळे, नायब तहसीलदार पेंदाम, निमजे यांनी काम पाहिले.
गोसे ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व
पवनी तालुक्यातील गोसे (बुज) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर समर्थित पॅनेलचे आशिषकुमार कुंडलिक माटे सरपंचपदी निवडून आले तर सदस्यपदी अनुप वसंतराव मेश्राम, पौर्णिमा संजय कावळे, पप्पू ज्ञानेश्वर वानखेडे, ममता अनिल वानखेडे, सीमा शिवशंकर लांडगे, सुचित अंकोश देव्हारे, अनिता राजरतन दहिवले निवडून आले.
शिरेगावटोलाच्या सरपंचपदी भाजप समर्थित रोहित संग्राम
साकोली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या एकमेव शिरेगावटोलाच्या सरपंचपदी भाजप समर्थित पॅनलचे उमेदवार निवडणुकीत रोहित भरत संग्राम विजयी झाले. तर सदस्यपदी जगदीश नाजूक आराम, सीमा घनश्याम कापगते, छाया हिरामण पंधरे, मोरेश्वर बाबूराव माऊली मेश्राम, इंदिरा विजय धुर्वे, रजनी ओमकार कापगते, भागवत चैत्राम चाचरे विजय झाले. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयापुढे मोठी गर्दी झाली होती.
भंडारा तालुक्यातील विजयी सरपंच
- केसलवाडा - जयराम शंकर वंजारी
- खमाटा - रुपाली रंजीत भेदे
- भोजापूर - सीमा जयेंद्र मेश्राम
- ईटगाव - कविता सोमनाथ चौधरी
- बोरगाव - संजय नीळकंठ लांजेवार
- तिड्डी - दत्तकुमार जगनाडे
- सुरेवाडा - दीक्षा जगदीश सुखदेवे
- टेकेपार - प्रियंका कुंभलकर
- सिरसघाट - पुष्पा उत्तम मेश्राम
- सालेबर्डी - समता लखन गजभिये
- परसोडी - नंदा प्रभाकर वंजारी
- राजेदहेगाव - स्वाती रत्नदीप हुमणे
- खराडी - आरती संजय हिवसे
- खैरी - सलीता जयदेव गंथाडे
- संगम - शारदा विजय मेश्राम
- पिंपरी - देविदास विक्रम ठवकर