Rahul Gandhi Speech ( Marathi News ) : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची लोकसभा निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा आज पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली या मतदारसंघातून राहुल गांधी यांनी राज्यातील प्रचाराचा शुभारंभ केला. आजच्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तसंच देशात काँग्रेसचं सरकार आल्यास गरिबी रेषेच्या खाली असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दरवर्षी १ लाख रुपये अर्थसाहाय्य करणार असल्याची घोषणाही आजच्या सभेत राहुल गांधींनी केली आहे.
"आम्ही सत्तेत आल्यास गरिबांसाठी काम करणार असून देशातील गरिबी रेषेच्या खाली असणाऱ्या कुटुंबाची यादी करू आणि या कुटुंबातील महिलांना वार्षिक १ लाख रुपयांची मदत करू. या महिलांच्या खात्यात दर महिन्याच्या १ तारखेला ८ हजार ५०० रुपये जमा होतील," असं आश्वासन राहुल गांधी यांनी आजच्या सभेतून दिलं आहे. राहुल गांधी यांचे आज दुपारी ३.१५ वाजता विशेष विमानाने नागपुरात आगमन झाले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने साकोलासाठी रवाना झाले होते.
राहुल गांधींच्या आजच्या सभेतील ठळक मुद्दे:
- काँग्रेस पक्ष शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी सरकार चालवणार आहे.
- काँग्रेसचा प्रयत्न तरुणांना रोजगार देणं आणि शेतकऱ्यांचं संरक्षण करणं, हा असणार आहे.
- भारतातील २०० मोठ्या कंपन्यांमध्ये एकही मागास प्रवर्ग, दलित किंवा आदिवासी व्यक्ती मालक नाही.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला ओबीसी म्हणवून घेतात, मात्र त्यांनी ओबीसींसाठी काहीच केलं नाही.
- काँग्रेसने यंदा आणलेला जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यात तुमच्या मनातील मुद्दे लिहिण्यात आले आहेत.
- नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्ष उद्योजकांसाठी सरकार चालवलं.
- मोदी सरकार आल्यानंतर उद्योगपती गौतम अडानी यांच्या शेअर्सची किंमत वाढली.
- आमचं सरकार आल्यावर जातीय जनगणना करणार.
विदर्भात काँग्रेसकडून प्रचाराचा धुराळा
राहुल गांधी यांच्या आजच्या सभेतनंतर उद्या १४ एप्रिल रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नागपुरात सभा होणार आहे. प्रियंका गांधींच्या चंद्रपूर दौऱ्याबाबत अनिश्चितता कायम आहे. चंद्रपूरच्या उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी १५ एप्रिल रोजी प्रियंका गांधी यांची सभा होणार होती. मात्र, इतर ठिकाणी सभा असल्यामुळे चंद्रपूरची सभा रद्द करण्यात आली आहे. ही सभा १६ किंवा १७ एप्रिल रोजी आयोजित करण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.