इंद्रपाल कटकवार
नवी दिल्ली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री भंडाऱ्यात दाखल झाले. दररोज मंत्र्यांचे दौरे सुरूच असून या दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. कुटुंबीयांचे सांत्वन करण्याला विरोध नाही. मात्र, आता दौऱ्यावर कोट्यवधी उधळण्यापेक्षा आधीच रुग्णालयातील सुविधांसाठी दीड कोटींचा निधी दिला असता तर त्या मातांची कूस रिकामी झाली नसती, असे मत व्यक्त होत आहे.
घटनेच्या दिवशीच तब्बल आठ मंत्री-नेते भंडाऱ्यात दाखल झाले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विश्वजित कदम, गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री संजय राठोड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावलकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा त्यात समावेश आहे. १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने दाखल झाले.
जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव कायमअग्निकांडानंतरही जिल्हा रुग्णालयाच्या कारभारात फारसा फरक पडलेला नाही. केवळ परिसराची आणि अंतर्गत रुग्णालयाची स्वच्छता तेवढी दररोज होत आहे. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सुविधा, आयसीयू कक्ष, तसेच ज्या कक्षात घटना घडली तो एसएनसीयू कक्षही बंद आहे. इतर विभागाचीही अशीच अवस्था आहे. डॉक्टर आणि परिचारिका तणावात दिसत असून उपचारही योग्य होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.