भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री भंडाऱ्यात दाखल झाले. दररोज मंत्र्यांचे दौरे सुरूच असून, या दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. अग्निकांडात प्राण गमावलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र, आता दौऱ्यावर होणारा कोट्यवधींचा खर्च यापूर्वीच रुग्णालयातील सोयी-सुविधांसाठी दिला असता तर त्या मातांची कूस रिकामी झाली नसती. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागली. दहा बालकांचा बळी गेला. संपूर्ण देशात खळबळ उडाली. घटनेच्या दिवशीच तब्बल आठ मंत्री भंडाऱ्यात दाखल झाले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विश्वजित कदम, गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री संजय राठोड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावलकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. रविवारी, १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने भंडाऱ्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पालकमंत्री विश्वजित कदम होते, तसेच उच्च पदस्थ अधिकारीही भंडाऱ्यात तळ ठोकून होते. ११ जानेवारी रोजी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, १३ जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शुक्रवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भंडाऱ्यात येऊन रुग्णालयाची पाहणी केली, तसेच अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा लवाजमा भंडाऱ्यात पोहोचला. या दौऱ्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. जनतेच्या करातून वसूल केलेल्या पैशांतून दौरे होत असल्याची माहिती आहे. दीड कोटींच्या अग्निशमन यंत्रणेवर सुरुवातीला खर्च न करणारे शासन आता मंत्र्यांच्या दौऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार सात दिवसांत मंत्र्यांच्या दौऱ्यावर सुमारे नऊ ते दहा कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत कुणीही अधिकृत बोलायला तयार नाही. यापूर्वीच जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर निधी खर्च केला असता, तर आज ते चिमुकले जीव आईच्या कुशीत खेळत असते. आता कोरडे सांत्वन केले जात आहे.
बॉक्स
जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव कायम
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या अग्निकांडानंतरही जिल्हा रुग्णालयाच्या कारभारात फारसा फरक पडलेला नाही. केवळ परिसराची आणि अंतर्गत रुग्णालयाची स्वच्छता तेवढी दररोज होत आहे. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सुविधा, आयसीयू कक्ष, तसेच ज्या कक्षात घटना घडली तो एसएनसीयू कक्षही बंद आहे. इतर विभागाचीही अशीच अवस्था आहे. डॉक्टर आणि परिचारिका तणावात दिसत असून, उपचारही योग्य होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.