तेलंगणातील रमेश अन्ना याचा दिवानजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर हा तांदूळाच्या रकमेच्या वसुलीसाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास भिरकड याचे रमेश अन्नाकडे दहा लाख रुपये ट्रक भाड्याचे थकले होते. त्यामुळेच त्याने लुटमारीचा कट रचला आणि २२ लाख ५० हजार रुपये लुटलेही परंतु भंडारा पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेने तो जेरबंद झाला. एखाद्या ट्रक मालकाचे धान व्यापाऱ्याकडे दहा लाख रुपये ट्रक भाड्याचे थकीत होत असेल तर किती मोठ्या प्रमाणात पूर्व विदर्भात तेलंगणातून तांदूळ आला असेल याची कल्पनाही करवत नाही. विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार परप्रांतातून धान आणि तांदुळाची निर्यात महाराष्ट्रात करता येत नाही. निर्यात करावयाची असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. जीएसटी बिलासह त्याची पूर्तता करावी लागते. परंतु परप्रांतातून तांदूळ खरेदीसाठी शासन परवानगी देत नाही. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धान पिकतो. खरीप व रबी या हंगामात धान खरेदी करतेवेळी शासनाच्या नाकी नऊ येते. धान ठेवायला गोदामही नसतात. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असतात. अशास्थितीत परप्रांतातून तांदूळ येतो म्हणजे नक्कीच त्यामागे काहीतरी काळेबेरे असण्याचा संशय आहे. या वाटमारीच्या प्रकरणाचा तांदूळ तस्करीशी संबंध जोडून तपास केल्यास मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे.
बॉक्स
अशी होते तांदळाची अदलाबदल
आधारभूत खरेदी केंद्रावर शासन धानाची खरेदी करते. हा धान मिलर्सला भरडाईसाठी दिला जातो. त्यासाठी त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. एक क्विंटल धानापासून ६७ क्विंटल धानाचा उतारा येणे अपेक्षित असते. हा तांदूळ नंतर स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविला जातो. मात्र अधिक पैसे कमावण्याच्या नादात व्यापारी परराज्यातून तांदूळ १८ रुपये किलो दराने खरेदी करतात. नंतर हाच तांदूळ शासनाला २४ रुपये किलो दराप्रमाणे विकतात. शासनाकडून आलेल्या आदेशानुसार शासकीय धान खरेदी केंद्रातील धान पुन्हा व्यापाऱ्यांनाच विकतात, असा हा गोरखधंदा जिल्ह्यात सुरू आहे. कोट्यवधीच्या घरात उलाढाल असते.
बॉक्स
धान खरेदीची सुरू आहे चौकशी
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निकृष्ट धान खरेदी प्रकरण विधानसभेत गाजले होते. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली होती. त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याच बरोबर आता परप्रांतीय तांदळाची चौकशी केल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
बॉक्स
सखोल चौकशीची गरज
तांदूळ खरेदी प्रकरणात कोट्यवधी उलाढाल केली जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होण्याची गरज आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये उकळणारे पुढे येतीलच परंतु आतापर्यंत आयकर, विक्रीकर आणि जीएसटीचे बुडविलेले पैसेही पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु राजकीय वरदहस्तात प्रकरण दडपले जाण्याची शक्यता आहे.