पालांदूर : हप्ताभरापूर्वी पालांदूर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांत ७९ कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. नेमका मृत्यू कशाने झाला हे तत्काळ सांगणे कठीण होते. त्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. हप्ताभरानंतर आज त्यांचा रिपोर्ट मिळाला. त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. बर्ड फ्लूच्या निगेटिव्ह रिपोर्टने कुक्कुटपालक व व्यापारी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
गत १२ व १३ जानेवारीला खराशी नाल्यावरील धनंजय भुसारी यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ७९ कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याच दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्लूचे वादळ घोंगावत होते. ती भीती बाळगत प्रशासनाने पालांदूर येथील त्या पोल्ट्री फार्मवर विशेष नजर ठेवली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोल्ट्री फार्मसह परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले होते. जिल्ह्यातील पशुसंवर्धन व महसुलातील अधिकारी यांनी त्या पोल्ट्री फार्मला भेट दिली होती. गत हप्ताभरापासून पालांदूर व परिसरात मटण बाजार व आठवडी बाजारसुद्धा बंद ठेवण्यात आला होता. यामुळे परिसरातील पोल्ट्री फार्मधारकांचे व व्यापारी वर्गाचे नुकसान झाले होते. शनिवारी आठवडी बाजारसुद्धा बंद राहिल्याने शेतकरी वर्गासह सामान्य ग्राहकांनाही त्याचा फटका बसला होता. मात्र आता अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र हटवत कुक्कुटपालकांना व व्यावसायिकांनासुद्धा काही काळजी घेत व्यापार पुनश्च सुरू करण्याकरिता समस्या असू नये असे वाटते.
अहवालानंतर कुक्कुटपालक व व्यापाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांची काळजी घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने व्यवसाय सुरू करण्यास अडचण नाही.