भंडारा : भारतीय बौद्ध महासभा, भंडारा जिल्हातर्फे शुक्रवारी वार्ड येथील महाबोधी विहारात त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२३वी जयंती सर्व जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुका अध्यक्ष-सरचिटणीस, तसेच कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाकारुणिक भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बहुजनांची आई, करुणेचा महासागर माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्रिशरण व पंचशील सामूहिकरीत्या ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा भंडाराचे अध्यक्ष प्राणहंस मेश्राम हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख अतिथी म्हणून सी.के. लेंडारे, सुरेंद्र बन्सोड उपस्थित होते. प्रास्ताविक भाषण आशाताई शेंडे यांनी सादर केले. त्या म्हणाल्या, आई रमाईचा त्याग अवर्णनीय आहे. त्याला शब्दात मांडणे शक्य नाही. स्वत: झिजून रमाईने आपणा सर्वांना मायेची सावली दिली. प्राणहंस मेश्राम म्हणाले, भारत देश जो उभा आहे, तो आई रमाईच्या असीम त्यागामुळे आहे. भारतीय संविधानामुळे आपल्याला जगण्यासाठी मोकळा श्वास मिळाला व हा श्वास मिळवून देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आई रमाईमुळेच घडले. जी स्वत: रडली, पण आपल्या करोडो लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य दिले. सी.के. लेंडारे म्हणाले, आई रमाई ही करुणेचा महासागर होती. जेव्हा वसतिगृहातील विद्यार्थी हे भुकेने व्याकुळ झालेले होते, तेव्हा आई रमाईने हातातील सोन्याच्या बांगड्या विकून त्यांना पोटभर जेवण दिले. सुरेंद्र बन्सोड म्हणाले, प्रत्येक भारतीय स्त्रीने आई रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले, तर खरंच या भारतभूमीवर स्वर्ग अवतरेल. आई रमाईचा त्याग अतुलनीय आहे. संचालन हरकर ऊके, भारतीय बौद्ध महासभा भंडारा जिल्हा सरचिटणीस यांनी तर आभार चंद्रबोधी मैत्रेय बौद्ध यांनी मानले. यावेळी माधुरी खांडेकर, रक्षा मोटघरे, जयश्री चवरे, इंदुताई बन्सोड, सुरेश रंगारी, भीमराव बन्सोड, पृथ्वीराज वैद्य, शशीकांत मेंढे, राजेश मोटघरे आदी उपस्थित होते.