भंडारा : घरी झोपलेल्या वैद्यकीय प्रतिनिधीला (एमआर) अतिविषारी मण्यार सापाने दंश केल्याची घटना तुमसर येथील विनोबानगरात बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अतिदक्षता कक्षात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
सचिन दामोधर हटवार (रा. विनोबानगर तुमसर) असे सर्पदंश झालेल्याचे नाव आहे. तो वैद्यकीय प्रतिनिधी असून मंगळवारी रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या घरी झोपला होता. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अतिविषारी मण्यार सापाने बिछान्यावर चढून त्याच्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. हाताला काही तरी चावल्याचे लक्षात येताच सचिन जागा झाला. पाहतो तर त्याला तेथे साप दिसून आला. तत्काळ देव्हाडी येथील सर्पमित्र मनोन चाैबे याला बोलाविले. या सापाला पकडले. तसेच सचिनला तत्काळ तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे सर्पदंशावरील औषध नसल्याने भंडारा येथे हलविण्यात आले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.