भाजप आणि शिंदे गट सर्व निवडणुका एकत्र लढणार - चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 04:50 PM2022-10-12T16:50:43+5:302022-10-12T17:14:52+5:30
पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
भंडारा : भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट अशी युती करून यापुढे सर्व निवडणुका लढण्याची आम्ही तयारी केली आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पहिल्यांदाच भंडारा येथे आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
आतापर्यंत आपण १८ जिल्ह्यांचा दाैरा केला असून हा १९ वा जिल्हा आहे. नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे. आपला दाैरा केवळ संघटनात्मक बांधणीसाठी असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, उद्या जरी निवडणुका झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी तयार आहे. आगामी नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक भाजप आणि शिंदे गट युती करून लढणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
भारताला शक्तीशाली करण्यासाठी युवा वाॅरियर्स भाजपसोबत जोडत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला, अशा लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी अभियान राबविले जाणार आहे. २०२४ पर्यंत दोन कोटी लाभार्थी या अभियानात सहभागी होतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पंजाच्या हाती मशाल
एका मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांची पक्षाचे नुकसान केले. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. पक्षाच्या मूळ विचारांपासून दूर गेले. त्यामुळे तुमच्या विचाराला आता कुणी मत देणार नाही, कोणतीही मशाल पेटणार नाही. उद्धव ठाकरे यांची मशाल काँग्रेसच्या पंजाच्या हाती आहे. तिचा कोणी स्विकार करणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भंडारासाठी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
"भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील"
चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधी देखील काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. "भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील" असा सूचक इशाराही बावनकुळेंनी दिला होता. तसेच "उद्धव ठाकरे मंत्रालयात १८ महिने आलेच नाहीत. त्यामुळे कोणत्या समित्या नाहीत, काम नाही. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटलं" असं म्हणत निशाणा साधला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही बोचरी टीका केली. "राष्ट्रवादीमध्ये काही लोकांचं भलं झालं. जे ५० प्रमुख नेते आहेत तेवढ्याच लोकांचं भलं झालं. खालच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे" असं म्हटलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"