प्रकरण चिखलमिश्रित पाणीपुरवठ्याचे : मुख्याधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न तुमसर : जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे तुमसर शहरात मागील १० दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. १० दिवसांपासून ही समस्या कायम असल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी यांच्या नेतृत्वात मंगळवारला भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेवर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तुमसर शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे चिखलमय पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळा सुरू झाला असून चिखलमिश्रीत पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधून घेण्याकरिता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांच्या कक्षात जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, शहराध्यक्ष विजय जायस्वाल, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम लांजेवार, माजी नगरसेवक प्रमोद घरडे, खेमराज गभणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. चिखलमिश्रीत पाणी एका बॉटलमध्ये भरून खेमराज गभने व प्रमोद घरडे यांनी नेले होते. शहरवासीयांना हे दूषित पाणी प्यावे लागते, असे सांगून हे पाणी तुम्ही प्या, यावरून चांगलीच शाब्दिक चकमक झाली. जलशुद्धीकरण केंद्र आठ दिवसात दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. यावेळी जिल्हा महासचिव प्रदीप पडोळे, प्रमोद घरडे, सुनिल लांजेवार, श्याम धुर्वे, शैलेश मेश्राम, लक्ष्मीकांत सलामे, योगेश रंगवानी, दिपक कठाणे, मुन्ना पुंडे, शोभा लांजेवार, कैलाश पडोळे, खेमराज गभने, ललित शुक्ला, अनिल साठवणे, डॉ.चंद्रशेखर भोयर, शेखर मलेवार, शेखर बिसेन, हुकुमचंद साखरवाडे, राजू गायधने, दिपक साकुरे, सज्जू शेख, बापू धांडे, सागर बिसने, अतुल चौधरी, नवनाथ मेश्राम, महेश आलमकर, गणेश मस्के, नरेंद्र मारबते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी) भाजपच जबाबदार -नगराध्यक्ष महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सन २००७ ला कोष्टी येथील पंपहाऊस नगरपरिषदेला हस्तांतरीत केली. त्यावेळी भाजपच्या नगराध्यक्षा गीता कोंडेवार होत्या. त्यावेळी तत्कालीन पाणी पुरवठा सभापती आशिष कुकडे यांनी ती योजना घेण्यापूर्वी प्राधिकरणाने हस्तांतरीत करावे याकरिता आक्षेप नोंदविले होते. परंतु श्रेय लाटण्यासाठी बिघाड असलेली योजना हस्तांतरीत केल्याने शहरवासीयांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तुमसर पालिकेवर भाजपचा हल्लाबोल
By admin | Published: July 13, 2016 1:32 AM