शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन माजी आमदार बाळा काशिवार यांच्या पुढाकारातून आज साकोली येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. असंख्य शेतकरी या आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष गिरेपुंजे, तारिक कुरेशी, माजी आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष इंद्रायणी कापगते, साकोली नगराध्यक्ष धनवंता राऊत, किसान आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, मानस साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते, साकोली तालुका अध्यक्ष लखन बर्वे, मनीष कापगते यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आघाडी सरकारने आणली. घोषणा करून शेतकऱ्यांना आशेवर ठेवणाऱ्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही अशा शब्दात यावेळी माजी आमदार बाळा काशीवार यांनी शासनावर टीका करीत वेळ आल्यास रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेऊ असेही सांगितले. माजी आमदार चरण वाघमारे यांनीही सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. सुनील मेंढे यांनी या सरकारचा चांगलाच समाचार घेतला. कोरोना काळात भाजपाचे कार्यकर्ते कोणतीही तमा न बाळगता लोकांच्या मदतीसाठी ही रस्त्यावर उतरले आहेत. सरकारातील नेते आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र सामान्य लोकांच्या परिस्थितीशी काहीही घेणे देणे नाही. शेतकरी धान खरेदी आणि बोनस या विषयाला घेऊन चिंतेत आहे. पण शासनातील नेते घोषणा करून निश्चित झाले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आंदोलन करीत राहील प्रसंगी आक्रमक भूमिकाही घेईल, असे खा. मेंढे यांनी सांगितले.