गोंदिया / भंडारा : जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत २६ जागा जिंकत वर्चस्व स्थापन केले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ९ जागा अधिक जिंकत जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ८ आणि काँग्रेसला तर १३ जागांवर समाधान मानावे लागले.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. यासाठी ७६२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत वर्चस्व निर्माण केले आहे. मागील निवडणुकीत भाजपला १७ जागा मिळाल्या होत्या. या यावेळेस ९ जागांची वाढ झाली असून एकूण २६ जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील निवडणुकीत २० जागा मिळाल्या होत्या तर यावेळेस ८ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला मागील निवडणुकीत १६ जागा तर या निवडणुकीत १३ जागा जिंकता आल्या. शिवसेनेला मात्र या निवडणुकीत जिल्हा परिषदेत खाते उघडता आले नाही. तर आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी पक्षाने जिल्हा परिषद ४ जागा जिंकत महत्वपूर्ण भूमिका सिद्ध केली आहे. तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला एका जागेची गरज पडणार असून अपक्ष उमेदवाराच्या मदतीने ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर आठपैकी सात पंचायत समितीवर भाजपने सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजप सत्ता स्थापन करुन अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालते याकडे लक्ष लागले आहे.
असे आहे संख्याबळ
भाजप : २६
काँग्रेस : १३
राष्ट्रवादी : ०८
चाबी : ४
अपक्ष : २
एकूण : ५३