नरेंद्र भोंडेकर यांची मागणी : शिवसेनेचा आंदोलनाचा इशाराभंडारा : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारसी लागू करण्याची मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून सातबारा कोरा न केल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील राहून शेतकरी, शेतमजूर व कामगाराच्या हिताकरिता शिवसेनेकडून शासनाचा निषेध करण्यात येईल. कर्ज मुक्ती न दिल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल. या आंदोलनात शांतता व सुव्यवस्था भंग झाल्यास त्याला राज्यशासन जबाबदार राहील, असेही भोंडेकर म्हणाले.संताची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कर्जाच्या विवंचनेत असलेला शेतकरी नैराश्यामुळे किटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवितो. परंतु शासनाला याचे कोणतेही दु:ख वाटत नाही. हेच बळीराजाचे दुर्देव आहे. त्यातही भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दु:ख मोठे आहे. येथील लोकप्रतिधींना शेतकऱ्यांच्या दु:खांशी काहीही घेणे देणे नसून अशा संवेदनहीन लोकप्रतिनिधीमुळे शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. भंडारा जिल्हा राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात धान पिक घेतले जाते. तलावाचा जिल्हा असूनही शासनाच्या संवेदनहीन धोरणामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. उत्पादन खर्च उत्पादीत किमतीपेक्षा जास्त असल्यामुळे बळीराजा आर्थिक कोंढीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मदतीचा हात न मिळाल्यामुळे व बँक, संस्था आणि सावकाराकडून बळीराजाचा मानसिक छळ सुरू आहे. अशा परिस्थितीत बळीराजांच्या आत्महत्येला राज्य सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.शिवसेनेने मात्र बळीराजाच्या या आत्महत्येचे राजकारण कधीही केले नाही. बळीराजाला स्वाभिमानाने उभा करण्यासाठी शिवसेना आक्रमकपणे लढा देईल, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, शहरप्रमुख सुर्यकांत ईलमे, यशवंत वंजारी, विजय काटेखाये, राजेंद्र ब्राम्हणकर, संदीप सार्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
By admin | Published: April 04, 2017 12:31 AM