लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आधारभूत किमत खरेदी केंद्रावर उन्हाळी धानाची खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले. शेतकऱ्यांनी लाखांदूर ते साकोली मार्गावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार लाखांदूर तालुक्यात १६ केंद्रावर धान खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासून विविध कारणांमुळे शेकडो शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. आता बारदान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच धान खरेदीची अंतिम तारीख ३० जून आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचा धान खरेदी होणे शक्य नाही. धान खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी बुधवारी लाखांदूर ते साकोली मार्गावर बारव्हा येथे रास्तारोको करण्यात आला. माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात गोपाल झोडे, धनू लंजे, लालचंद बुद्धे, गुलाब झोडे, राजेंद्र मेश्राम, मोरेश्वर भैसारे, मुकेश कोरे, पतीराम झोडे, हिरालाल बगमारे, सुखदेव लंजे, आदेश फुंडे, रवी डोंगरवार, घनश्याम लंजे, ऊल्हास झोडे, नितीन मेश्राम, महादेव झोडे, रघुनाथ लंजे, रेवा शेंद्रे, टिकाराम गायकवाड, बाळकृष्ण कोचे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
आश्वासनानंतर आंदोलन मागे - रास्ता रोको आंदोलनला नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, दिघोरीचे ठाणेदार नीलेश गावंडे, विजयलक्ष्मी राईस मिलचे सचिव आशिष बुरडे, आभास बेरोजगार संस्थेचे संचालक बाळू दहिवले यांनी भेट दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड व जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता येत्या दोन दिवसांत धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.