लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील दोन वर्षापासून आंतरजिल्हा बदली अनियमिततेबाबत ५ जून रोजी सायंकाळी ५.१५ वाजता आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबियांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणाबाबत जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.४ जूनपासून प्रहार शिक्षक संघटनाद्वारा आयोजित आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांचे जिल्हा परिषद भंडारा समोर आमरण उपोषण सुरु आहे. आंतरजिल्हा बदलीने भंडारा जिल्हा परिषदेला बदलून आलेल्या ११७ शिक्षकांच्या नियमबाह्य झालेल्या बदल्या रद्द करणे, २०१८ मध्ये जिल्हा परिषदेत शिक्षकांची १२३ पदे रिक्त असताना आॅनलाईन बदलीने दोनच पदे भरल्याने उर्वरीत पदावर विशेष बाबअंतर्गत बदली देण्यास्तव प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे या मागण्यांचा समावेश आहे. परंतु भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा आरोप करीत या शिक्षकांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर ते परत उपोषण मंडपात आले. यात वंदना हटवार, खंडाळे, मदनकर, आदी कुटुंबियांनी सहभाग घेतला होता.
शिक्षकांच्या कुटुंबीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 10:47 PM