लाखनी : संपूर्ण देशाने कोरोना काळ अनुभवला. पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीमध्ये रक्तदान कमी प्रमाणात होत आहे. रक्तपुरवठा होताना मोठी अडचण येत आहे. अशा परिस्थितीमध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाच्या वतीने २३ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर देशव्यापी असून या रक्तदानाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. त्यात लाखनी येथील समर्थनगर स्थित क्रीडासंकुल, मोहाडी येथे महादेव मंदिर आणि लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे डॉ. ब्राह्मणकर क्लिनिक येथे रक्तदान शिबिर होणार आहे. या रक्तदान शिबिरामध्ये पत्रकार संघ, लाखनी मित्र परिवार, स्वप्नपूर्ती फाउंडेशन, मॉर्निंग ग्रुप लाखनी, शिवरुद्रम ग्रुप, सृष्टी नेचर क्लब, पूज्य सिंधी पंचायत, लक्ष्मणराव दोनोडे ट्रस्ट, साद माणुसकीची समूह, पतंजली योग समिती, शिवनीबांध जलतरण संघटना साकोली, समर्थ महाविद्यालय लाखनी, नरेंद्र महाराज सेवा मंडळ आदी समाजसेवी संस्थांचे देखील सहकार्य लाभणार आहे.
उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते होणार आहेत. शिबिर हे सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि ३ वाजेपर्यंत चालणार आहे. या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, सचिव डॉ. केशव कापगते, कोषाध्यक्ष डॉ. अमित जवंजार, डॉ. गणेश मोटघरे, डॉ. राजेश चंदवाणी, डॉ. सुनील बोरकुटे, डॉ. रवी हलमारे, डॉ. देवेंद्र धांडे, डॉ. सिद्धार्थ रंगारी यांनी केले आहे.