३५ युवकांनी केले रक्तदान
जांब (लोहारा) : 'रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान,' असे समजले जाते. जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने कांद्री सेवा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने २४ मे रोजी सकाळी माँ भवानी मंदिराच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने यंदा सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली आहेत. त्यामुळे सध्याच्या आपत्ती काळात रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिर राबविण्यात आले.
कांद्री येथे सेवा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या संख्येने युवक, युवतींनी रक्तदान करून राष्ट्रीय व सामाजिक दायित्व पार पडले. याप्रसंगी शिबिराकरिता समर्पण ब्लड बँक भंडारा व सेवा ग्रुप सदस्य अविनाश इंगोले शेखर बडवाईक, अमोल डोनारकर, पुरुषोत्तम नखाते सर्व सदस्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. याप्रसंगी डॉ. आशिष माटे, डॉ. सुनील चवळे, डॉ. महेश थुमनखेडे यांनी रक्तदान केंद्राला सदिच्छा भेट दिली आणि उपस्थित नागरिक आणि युवामित्रांना कोरोना महामारी व रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी अविनाश इंगोले म्हणाले, रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास ३५ च्या वर सेवा ग्रुपच्या सदस्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा. याअनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. नखाते, डॉ. प्रिया साकुरे रोशनी लांजेवार, आदित्य भोयर, भूषण वाघाडे अधिनाश इंगोले, शेखर बडवाईक, अमोल डोनारकर, पुरुषोत्तम नखाते, मनोज इंगोले, करण पिल्लारे आदी उपस्थित होते.