०६ लोक ०३ के
लाखांंदूर : रक्तदान हेच जीवनदान समजले जाते. कुणाच्या रक्तदान करण्यामुळे जखमींचे, उपचारार्थ रुग्णांचे प्राण वाचू शकतात, हे सामाजिक भान लक्षात ठेवून तालुक्यातील काही युवकांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान चळवळ उभी केली आहे. या युवकांमध्ये योगेश देशकर, मिलिंद परशुरामकर, मोहित रायपुरे, गोवर्धन निनवाने, रोहित भुरले, गणेश बगमारे, सतीश ठाकरे, राहुल दिवठे, श्रीधर देसाई व अन्य काही युवकांचा समावेश आहे.
रक्तदान केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होत नसून एका गरजूला रक्ताची पूर्तता होते. रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्त तयार होते, अशी संकल्पना गत काही वर्षांपूर्वी तालुक्यातील योगेश देशकर नामक युवकाला सांगण्यात आली. त्यानुसार, योगेश आंतर जिल्ह्यातील एका संघटनेसोबत जोडून रक्तदान करीत असे. बऱ्याचदा आंतर जिल्ह्यात रक्तदान केल्यामुळे त्याला संबंधित रक्तदान चळवळीशी संपूर्ण माहिती मिळाली आणि अशी चळवळ आपल्या तालुक्यात देखील व्हायला हवी, असे त्याच्या मनात आले. त्याने तालुक्यातील काही युवकांशी संपर्क साधून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एक रक्तदान चळवळ उभी केली.
तालुक्यातील युवकांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून, त्यांना रक्तदानाविषयीचे फायदे व रक्तदानाविषयी जागरूक केले. कुठेही कुणाला रक्ताची गरज भासली, त्याची माहिती संबंधित ग्रुपवर कोणत्याही सदस्याच्या माध्यमातून येते. ग्रुपमधील सदस्य संबंधित रक्तगटाचा व्यक्ती उपलब्ध आहे का हे ठरवितात आणि जर रक्तदान करण्यासाठी इच्छुक असतात, तर मी रक्तदान करू शकतो, असे ग्रुपवर लिहून पाठवितात. अशा वेळी संबंधित रक्तदाता स्वखर्चाने दाखल रुग्णालयात पोहोचतो व रक्तदान करून घरी येतो.
ही रक्तदान चळवळ राजकीय हस्तक्षेप विरहित असून, यात रुग्णांकडून कुठलीही पैशाची मागणी केली जात नसल्याची माहिती ग्रुपचे सर्वेसर्वा योगेश देशकर यांनी दिली आहे. या वर्षभरात जवळपास ३०० रुग्णांना रक्तदान केल्याची माहिती दिली असून, यात भंडारा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, गोंदिया, पुणे, नागपूर व वर्धा या ठिकाणी जाऊन रक्तदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.